कळी अलगद पहिल्या प्रेमाची शीतल दवबिंदुंनी खुलते |
शहारूनी भावना मनातील कवितेचे हे फुल ऊमलते |
सोनेरी स्वप्नांची किरणे पाकळ्यांवरी हळूच विसावून |
सुगंध हृद्यातील कवितेच्या हसतो विश्वाचे मन मोहून |
काळरूपी परी चित्रकार हा ह्या विश्वाचा असतो लहरी |
कुंचल्यातुनी रंग बदलुनी चाल खेळतो हा मग गहिरी |
रेघ ओढुनी मग विरहाची हा दोघांचे विश्व दुभंगतो |
भावविश्व अंधारून तो मग गर्दिमध्ये स्वत: हरवतो |
अडखळूनी ठेचाळून घेतो परी हा अखेर शोध स्वत:चा |
स्वप्नांच्या क्षितीजाला पहाता पुन्हा पाय अडतो दृष्टीचा |
गर्दितुन पहिल्या प्रेमाची आठवण ह्याला खुणवून जाते |
हृद्यातुन मग शब्द ऊमटतो काय रे ती सध्या काय करते ?
- मकरंद सुधाकर पाटोळे.