वेळ सांगते घड्याळ की ह्या विश्वातील सत्याचे सार |
घड्याळात पहाताना करूया आपण ह्याचा जरा विचार ||धृ.||
जणू सत्याचे भान हरवूनी चित्त वेधण्या ऊनाड धडधड |
पुढे राहण्यासाठी केवळ सुरूच ज्याची बाष्कळ धडपड |
सेकंद काट्याच्या वृत्तीचे विवेकबुध्दीशी जणू वैर | घड्याळात … || 1 ||
ठाम स्वत: जो निर्धारावर नसे भय त्याला स्पर्धेचे |
पाऊल त्याचे भान देऊनी जाते विश्वाला काळाचे |
म्हणूनी करते जणू बुध्दीहि मिनिटाच्या काट्याचा आदर | घड्याळात… || 2 ||
शर्यतीत ह्या मागे जो तो अढळ आपुल्या ध्येय्यावरती |
तार्यासम तो कारण फिरते विश्वची अवघे ह्याच्याभोवती |
ठसा ऊमटवून जाते अपुला कोण ह्यातले मग विश्वावर ?
घड्याळात… || 3 ||
त्रिकोण काट्यांचा आवश्यक तोल साधण्यासी काळाचा |
हात पकडण्या ह्या काळाचा वारू आवश्यक प्रगतीचा |
ऊधळून घोडा पण मग झाले कोण आज कोणावर स्वार ?
घड्याळात पहाताना करूया आपण ह्याचा जरा विचार || 4 ||
- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा