वास्तव !

वास्तव !

बुधवार, २० डिसेंबर, २०१७


कळी अलगद पहिल्या प्रेमाची शीतल दवबिंदुंनी खुलते |

शहारूनी  भावना मनातील कवितेचे  हे  फुल  ऊमलते |


सोनेरी  स्वप्नांची  किरणे  पाकळ्यांवरी  हळूच  विसावून |

सुगंध  हृद्यातील  कवितेच्या  हसतो  विश्वाचे  मन  मोहून |


काळरूपी  परी  चित्रकार  हा  ह्या  विश्वाचा  असतो  लहरी |

कुंचल्यातुनी  रंग  बदलुनी  चाल  खेळतो  हा  मग  गहिरी |


रेघ  ओढुनी  मग  विरहाची  हा  दोघांचे  विश्व  दुभंगतो |

भावविश्व  अंधारून  तो  मग  गर्दिमध्ये  स्वत:  हरवतो |


अडखळूनी  ठेचाळून  घेतो  परी  हा  अखेर  शोध  स्वत:चा |

स्वप्नांच्या  क्षितीजाला  पहाता  पुन्हा  पाय  अडतो  दृष्टीचा |


गर्दितुन  पहिल्या  प्रेमाची  आठवण  ह्याला  खुणवून  जाते |

हृद्यातुन  मग  शब्द  ऊमटतो  काय  रे  ती  सध्या  काय  करते ?

- मकरंद सुधाकर पाटोळे.

...........मातृत्व..­.............




पाहून इवला जीव चेव
त्या गर्दीच्या झंझावाताला |


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||धृ.||




तळपत होता सूर्य शिरावर पेटवूनी भूमी वैराण |


कळप मृगांचा 'निष्ठूर' सोडून मागे ती हरिणी गतप्राण |


पाडस परी अडखळले मागे पाहून निपचीत त्या मातेला | नेत्रातील...||1
||



जीव भुकेने व्याकुळ त्याचा अजाण बिलगे तिच्या शवासी |


मायेचा तो 'पाझर' परिचीत
का परका ?
ना कळूनी त्यासी |


ऊब
शोधूनी ना सापडली 'मायेची' परी त्या पिल्लाला | नेत्रातील ...||2||




'मृत्यू हुंगून' येत गिधाडे पाडसास हुसकविले त्यांनी |


शवास वेढून लचके तोडून जणू 'ममतेसी'
गेली गिळूनी |


पाहूनीच गहिवरले पिल्लू मग 'मायेच्या'
सांगाड्याला | नेत्रातील...||3||



मातेवीण पोरके हरवले एकांती हे पाहून
पाडस |


'मृत्यूला' रुपात चित्त्याच्या हमला करण्याचे मग धाडस |


आळवित असता मातेला मृत्यू गिळूनी ह्या पिल्लाला | नेत्रातील ....||4||




कुठे ऊपाशी तळमळणार्या पिल्लाने मातेसी हळहळ |


सिंहांच्या गर्जना सभोवती परी जिंकून हृद्यातील तळमळ |


आली सोपवूनी ते पिल्लू
'आई'
बिबट्याची झाडाला | नेत्रातील...||5||




दृष्टीआड तिज होता पिल्लू सिंहांची 'कुदृष्टी' तिजवर
|



'स्पर्धक' समजून
ह्या मातेला हल्ला हिंसक मग 'ममतेवर' |


रक्ताच्या थारोळी 'स्पंदन' विझले आठवूनी 'बाळाला' | नेत्रातील...||6||





पिल्लाची मग हाक
होऊनी इथे
'पोरकी' प्रतिसादावीण |


मातेसी शोधण्या भटकता ऊघड्यावरती हे छायेवीण |


कुत्र्यांनी मग त्यास वेढूनी लाजविले
त्या 'निर्द्यतेला' | नेत्रातील...||7||




दूरचित्रवाणीवर भयाण
ह्या सत्याला स्वत: पाहूनी |


रडे माय 'बाळावीण'
आशा जिला लावली विज्ञानानी |


वाचा फुटली मग
तिच्यातल्या त्या रडणार्या 'मातृत्वाला'| नेत्रातील...||8||




"प्रेम-भावना परक्या म्हणतो आपण ह्या प्राणीजगताला |


परी 'ममतेचा श्वास'
जगवितो ह्या पिल्लांच्या 'अस्तित्वाला' |


मानवात म्हणूनी तर आई नावच दुसरे 'मातृत्वाला'| नेत्रातील...||9||




जीव जिचा त्या बाळामध्ये 'श्वासासम'
त्या हृद्यी धरूनी |


दु:खाच्या चटक्याला जाते हिचीच फुंकर
'शीतल' करूनी |


कोलमडूनी पडता स्पर्शातून देते बळ ह्याच्या 'धैर्याला' | नेत्रातील ...|| 10||




'पिल्लाची वेदना'
सांगती व्रण खोल
तिच्याच 'हृद्याचे' |


रोग हरे जी बाळाचा त्या स्वास्थ्य अर्पूनी त्यास 'स्वत:चे' |


साद स्पंदनाची गुदमरते 'ह्याची'
मुकुनी 'प्रतिसादाला' | नेत्रातील...||1
1||




बळ पंखातील वाढून
ऊडूनी मागे सारून
त्या क्षितीजाला |


जरी पिल्लाचे हृद्य विसरले मायेच्या मंजुळ हाकेला |


परी 'आईचा'
श्वासही 'अंतिम' साद
घालूनी जातो ह्याला | नेत्रातील...||1
2||


.
'साद' कुठे
इवल्या हृद्याची आईच्या हृद्याला 'बिलगून' |


धडकी भरणार्या बुरूजाला गेली आई 'थिटेच' ठरवून |


'अहंकार' गळला बुरूजाचा पाहून 'ममतेतील शक्तीला' | नेत्रातील...||13||





म्हणूनी लक्ष माता- भगिनींची जडली ज्यांच्या ठायी भक्ती |


स्वत: त्याच शिव
छत्रपतींनी ममतेतील ऊलगडण्या शक्ती |


हिचे नाव देऊन बुरुजाला केले वंदन ह्या 'ममतेला' |नेत्रातील...||14||




वसे तीच
ममता स्त्री हृद्यी जी बाळावीण कधी 'पोरकी' |


'हाक'
अनाथालयातल्या त्या बाळांची तिज नव्हती 'परकी' |


मिळे 'ऊब मायेची' मग
त्या थरथरत्या इवल्या पिल्लाला |
नेत्रातील...||15||




'विज्ञानाचे हात' अर्पिता रक्ताचे नाते त्या स्त्रीला |


अनाथ बाळाचा का 'टाहो' ध्वनीत ह्या 'प्रगतीच्या' दबला ? |


'हरिणाच्या पिल्लासम' का मग आज दिशा ह्या गिळतील ह्याला ?| नेत्रातील...||16||




'बिबट्याच्या पिल्लासम' हरवून इथे मुकुन त्या 'प्रतिसादाला' |


केविलवाणे ठरून गिळेल का 'निर्द्यता' ह्या बाळाला ? |


हृद्यी भिडेल कधी हाक
की ह्या 'आधूनिक
हिरकणीला' ? |
नेत्रातील...||17||




'आप-पर'
भावाची दरी ती हिचे
पाय
का ओढिल मागे ?|


थिटी ठरवूनी जाईल
दरीस कि जुळवून
'मायेचे धागे' ? |


मिळेल का 'प्रेमाचा' पाझर ह्या 'व्याकुळलेल्या' पिल्लाला ? |" नेत्रातील...||18||





हृद्यामधल्या 'मातृत्वाच्या' ह्या प्रश्नांनी विचलीत होऊन |


दूरून 'पोरक्या' बाळाची मग साद 'हिला' गेली हेलावून |


'अपुले-परके' दरी मध्ये
जी दिसली 'क्षूल्लक
ह्या आईला'|


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||19||




-मकरंद सुधाकर पाटोळे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७


..........  परोपकारी !  ...........


पोट  स्वत:चे  भरता  वनस्पती  विश्वाला  जगवून  जाते |

भरल्यापोटि   मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  ?  || ध्रू .||



वसुंधरेच्या  हाती  ऊरती  माती  ज्याच्या  अस्तित्वावीण |

नावच  त्याचे  " जीवन "  कारण  अशक्य  हे  जीवन  पाण्यावीण |

प्राणवायुच्याशिवाय  पण  का  हे  पाणीहि  जीवन  ठरते  ?
| भरल्यापोटि ... || 1 ||



जसा  श्वास  हृद्याला  तशीच  ऊर्जा  आवश्यक  सृष्टीला |

सहस्त्र  किरणांतुनी  जरी  हा  रवी विखुरतो  ह्या  ऊर्जेला |

सृष्टीच  असती  जर  हाताविण  दान  तिच्या  का  हाती  ऊरते ?
| भरल्यापोटि ... || 2 ||



दिला  अर्थ  सुर्याला  अन  जणू  ह्या  पाण्याला  वनस्पतींनी |

सुर्याच्या  ऊर्जेला  सांधुन  पर्णरूपी  अनंत  हातांनी |

प्राणवायु  पाण्याचा  गुंता  त्या  हातांनी  हि  सोडवते |
भरल्यापोटि ... || 3 ||



मंथन  करते  जणू  पाण्याचे  रेणूंच्या  बंधास  ऊलगडून |

करूनी  मुक्त  मग  प्राणवायुला हायड्रोजनला  धरते  रोखुन |

कारण  स्फोटक  स्वभाव  त्याचा  वनस्पतीहि  जाणून  असते |
भरल्यापोटि ... || 4 ||



स्वभावसंसर्गाने  होईल  प्राणवायु  विध्वंसक  जाणून |

गिळूनी  हायड्रोजन  अन  शोषुन  कर्बवायुलाहि  सृष्टीतुन |

 विषास  गिळता  "वनस्पती" मग      श्वास  मोकळा  "सृष्टी" घेते |
भरल्यापोटि ... || 5 ||

अमृत  मिळते  " विषास  पचवून "  जणू  हे  वनस्पतीला  ऊमगुन |

गिळूंनी  वायुंना  ह्या  मिसळून  स्वभाव  त्यांचा  परस्परांतुन |

विषातुनी  " ऊर्जेचे  अमृत "  विश्वाकरता  हिच  घडवते |

भरल्यापोटि  मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  || 6 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे.

शनिवार, ७ मे, २०१६

....... // घड्याळ \\ …….

               

वेळ  सांगते  घड्याळ  की  ह्या  विश्वातील  सत्याचे  सार |

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  ||धृ.||

जणू  सत्याचे  भान  हरवूनी  चित्त  वेधण्या  ऊनाड  धडधड  |

पुढे  राहण्यासाठी  केवळ सुरूच  ज्याची  बाष्कळ  धडपड  |

सेकंद  काट्याच्या  वृत्तीचे  विवेकबुध्दीशी  जणू  वैर  |           घड्याळात … || 1 ||

ठाम  स्वत: जो  निर्धारावर  नसे  भय  त्याला  स्पर्धेचे  |

पाऊल  त्याचे  भान  देऊनी  जाते  विश्वाला  काळाचे  |

म्हणूनी  करते  जणू  बुध्दीहि  मिनिटाच्या  काट्याचा  आदर  | घड्याळात… || 2 ||

शर्यतीत  ह्या  मागे  जो  तो  अढळ  आपुल्या  ध्येय्यावरती  |

तार्यासम  तो  कारण  फिरते  विश्वची  अवघे  ह्याच्याभोवती  |

ठसा  ऊमटवून  जाते  अपुला  कोण  ह्यातले  मग  विश्वावर  ?

घड्याळात… || 3 ||

त्रिकोण  काट्यांचा  आवश्यक  तोल  साधण्यासी  काळाचा  |

हात  पकडण्या  ह्या  काळाचा  वारू  आवश्यक  प्रगतीचा  |

ऊधळून  घोडा  पण  मग  झाले  कोण  आज  कोणावर  स्वार  ?

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  || 4 ||

- मकरंद  सुधाकर  पाटोळे  कदम.

.......शंकाग्रस्त बीज !........

जीवनदायी  रक्षणकर्त्यांचा  जर  घातच    प्रघात  ईथला |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || धृ.||

क्षितीजाचेहि  नसते  बंधन  शापित  भूमी  अथांग  ऐशी  |

रक्त  जळून  छायेवीण  जिकडे  सांगाड्यांच्या  अगणित  राशी  |

अनंत  वर्षे  शाप  भोगुनी  फुटे  पालवी  मग  धरणीला  | ईतरांसाठी ...|| 1 ||

करूणामयी  मग  रोप  ऊगवते  हिमालयाचे  धैर्य  अंतरी  |

वार  झेलुनी  ते  सृष्टीचे  रोप  पसरते  परोपकारी  |

श्वास  पाहूनी  तडफडणारे  रोप  घडविते  वटवृक्षाला | ईतरांसाठी ...|| 2 ||

छाया  ह्याची  बनते  घरकुल  जणू  श्वास  हा  प्रत्येकाचा  |

मरूभुमीतील  तृष्णेसाठी  जणू  निर्झर   हा  चैतन्याचा  |

कल्पवृक्ष  हा  आनंदाचा का   खुपतो  मग  त्या  दैवाला ?  ईतरांसाठी ...|| 3 ||

झंझावाती  येऊन  तांडव  प्रलयमेघ  त्या  नभास  गिळूनी  |

थरथरती  मग  दहा  दिशा हि  ईथे  दामिनींच्या  नृत्यानी  |

ढाल  बनवूनी  तरू  स्वत:सी  धरतो  हृद्यी  प्रत्येकाला  | ईतरांसाठी ...|| 4 ||

निर्भय  ऊंच  तरू  हा  पाहून  अहं  ठेंगणा  नभी  विजेचा  |

नखशिखान्त  पेटूनी  दामिनी  प्राण  जाळूनी  जाते  ह्याचा  |

बीज हि  जळते  जमिनीमध्ये  प्रश्न  विचारून  हाच  स्वत:ला  |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || 5 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.

......// वैषम्याची छाया \\……



सौंदर्याची   किनार  असते  "सीमा"  भीषण  अंधकुपाची  | 

"माध्यम" युगात  राहून  जाणीव  परि  नाहि  का  ह्या  सत्याची  ?
|| धृ. ||

क्षितीजावर  रंगांची  धुळवड  पहाट   स्वप्नाला  रंगवते  |

अस्तित्वावीण  "त्याच्या"  परि  जिकडे  हि  "तिचीच"  होळी  जळते   |

तिथे  स्वयं   तेजाला  खेटून  असते   सत्ता  अंधाराची  || "माध्यम" युगात || 1 || 


सुर्याच्या  तेजाला  ईच्छा  जरी  अंधाराला  गिळण्याची  |

प्रखर  तेज  धरण्या  किरणांचे  नसुन  ओंजळी  "त्या"  हातांची  |

तेज  रवीचे  ईथे  जाळते  दिप्ती  नेत्रातील  ज्योतींची  || "माध्यम" युगात || 2 ||


अंधकुपागत  मिजास  "येथे"  दगडाच्या  ईवल्या  छायेला  |

पर्वत , गर्दवनांच्या  कुशीत  अभयदान  परी  त्या  भुमीला  |

तेज  विखरूनी  रवीचे  जिकडे  "हुळहुळ"  "त्याच्या  अस्तित्वाची" |
"माध्यम" युगात || 3 ||


"जी"  तेजाने  न्हाऊन  निघते  तिचे  अंग  ते  तेज  पोळते  |

मगरमिठीतील  तिमीराच्या  भुमीचा  "हिमयुग"  श्वास  कोंडते  |
 

ईथे  ओढ  नसते  "त्याच्यावीण"  विषमतेस  ह्या  समानतेची  || "माध्यम" युगात || 4 ||


"जळून - गोठणे" भुमीची  जणू  दिनचर्या  त्या  ऋतुचक्रावीण  |

नंदनवन  "ती"  आघातांचे   त्याच्या  मायेच्या  "छत्राविण"  |

झेलून  अनंत  आघातांना  करी  राख  "जे" पाषाणांची  || "माध्यम" युगात || 5 ||
 

ईवलीशी  मग  ऊल्का  पाहते  तुच्छपणाने   ह्या  भुमीला  |

"रान  मोकळे" पाहून  चढते  बळ  मग  ऊल्केतील  क्रौर्याला  |

अनंत  काळे  डाग  सांगती  जणू   कहाणी  त्या  "वारांची"  ||
"माध्यम" युगात || 6 ||



आघातांना  पचवून  आशा  भुमीला  तरी  जणू  "ऊद्याची"  |

नभी  "शांतीचा"  रंग  भरे  जो  वाट  पहाता  त्या  दिवसाची  |

"रात  ढळे  ना  परि  गगनातील"   नभात  सत्ता  जरी   सुर्याची  || "माध्यम" युगात || 7 ||


"कर्करोग"  झिरपे   तेजातुन  कुणा  जाण  का  ह्या  सत्याची  ?

संवेदनाच  नसता  येथे   गर्दि    "शोभेच्या"   दगडांची  |

कारण   "चांद्रभुमी" हि  नसते  साथ  जिला  "वातावरणाची" |

"माध्यम" युगात  राहून  जाणीव  परि  नाहि  का  ह्या  सत्याची  ?   

-  मकरंद  सुधाकर  पाटोळे  कदम.